मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस : नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड : मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही चांगला पाऊस आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. औरंगाबादच्या सोयगाव तालुक्यतील बनोटी येथे हिवरा नदीला पूर आला आहे. त्यामुळे गावाचा पूल वाहून गेला असून गावाचा संपर्क तुटला आहे. नदीला सध्या पुर असल्याने गावातही पाणी घुसले आहे. पाऊस सुरू आहे आणि पूल ही वाहून गेल्याने मदत कार्य करण्यास अडचणी येत आहेत.
बीड जिल्ह्यात काही भागात मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळत आहे. कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. कुंडलिका आणि माणिकर्णीक नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने नदी काठावरील गावांना इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, काल हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली काही भागात तर जोरदार पाऊस झाला या पावसामुळे काही भागातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. माजलगाव तालुक्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. राजेवाडी येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. कुंडलीका नदीला पावसामुळे अक्राळविक्राळ रूप आल्याचं पाहायला मिळत आहे तर बीड तालुक्यातील आंबेसावळी येथील मनकर्णिका नदीला पूर आला आहे. मागील अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. बीड जिल्ह्यातील काही भागात मोठा पाऊस झाला तर अजूनही बीड जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

Share