राज्यात ५ वी ते १० वी पर्यंत ‘मराठीसक्ती’
मुंबई : ‘मराठीसक्ती’ राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये ५ वी ते १० वी च्या वर्गांसाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आल्याचे शुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागाने सोमवारी जारी केले.
‘मराठीसक्ती’
महाराष्ट्र राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या अभ्यासक्रम असलेल्या, सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा राज्याने विधीमंडळात पारित केला आहे. मात्र, शालेय शिक्षण विभागाने शासन आदेश काढताना इयत्ता ५ वी ते १० वी या इयत्तांसाठी मराठी भाषेला द्वितीय भाषेचा दर्जा देताना सक्ती या शब्दाचा वापर केला नव्हता.
त्यामुळे मराठी भाषा शिकविण्यास उत्सुक नसलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद (आयसीएसई), आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (आयबी), केंब्रीज मंडळाच्या अनेक शाळांनी पळवाट शोधत मराठी भाषा विषय शिकवण्यास टाळाटाळ केली होती.
याबाबतच्या तक्रारी आल्याने शालेय शिक्षण विभागाने सोमवारी शुद्धीपत्रक काढले. यात शालेय शिक्षण विभागाने 1 जून 2020 रोजी काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी व 10 वी आदी इयत्तांसाठी सर्व मंडळाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा द्वितीय सक्तीचे असे वाचावे असे शुद्धीपत्रकात म्हटले आहे.