सिंचन विहिरीचे अनुदान मिळण्यासाठी विहिरीत उतरून आंदोलन

सालेकसा 30: धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत दोन वर्षांपासून प्रलंबित अनुदान देण्यात यावे, वीज जोडणी त्वरित करण्यात यावी, या मागणीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३०) सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे पाणी भरलेल्या विहिरीत उतरून अनोखे आंदोलन केले. प्रहार संघटनेच्या बॅनरखाली हे आंदोलन करण्यात आले.
शासनाच्या धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत २०१९-२० मध्ये जिल्ह्यातील जवळपास ५०० शेतकऱ्यांना प्रती लाभार्थी अडीच लाख रुपये विहिर बांधकामासाठी मंजूर झाले होते. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होत प्रसंगी उसणवारी करत विहिर बांधकाम केले. परंतु, दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी, मंजूर निधी लाभार्थ्यांना मिळाला नाही. हा निधी मिळावा, म्हणून बहुतांश पीडित लाभार्थ्यांनी शासन, प्रशासनाकडे कित्येकदा पत्रव्यवहार केला. निवेदने दिली. तरीही प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, संतप्त झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या बॅनरखाली भजेपार येथील छगन बहेकार यांच्या शेतातील विहिरीत उतरून अनोखे आंदोलन केले. मागण्यांची पूर्तता जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने प्रशासन हादरले. त्यांनी तत्काळ आंदोलनस्थळ गाठून आंदोलक शेतकऱ्यांची समजूत घातली. परंतु, जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे आंदोलकांनी तालुका प्रशासनाला ठणकावून सांगितले. सकाळी १० च्या सुमारास सुरू झालेले आंदोलन नंतर विहिरीतून बाहेर येत मंडपात सुरू करण्यात आले.
आंदोलनात प्रल्हाद बहेकार, छगन बहेकार, टायकराम ब्राह्मणकर, भागवत बहेकार,
जागेश्वर भांडारकर, रघूनाथ चुटे, पुरुषोत्तम बहेकार, आमगाव तालुकाध्यक्ष सुनील गिरडकर, सालेकसा तालुकाध्यक्ष अभय कुराहे, मिथीलेश दमाहे, जय मच्छिरके, विशाल दसरिया, चंदू बदवाईक, सुभाष उईके, देवा टेकाम, बंटी बावनथडे आदी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी सालेकसाचे ठाणेदार अरविंद राऊत, तलाठी नागपुरे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share