सव्वा लाखांची लाच घेताना तहसीलदारासह शिपायाला रंगेहाथ पकडलं

कल्याण – शिक्षणअधिकारी महिलेने लाच घेण्याचं प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक बडा अधिकारी आणि शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. या प्रकरणातील आरोपी तहसीलदार दीपक आकडे आणि शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड यांना अटक करण्यात आली आहे.

जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी एक लाख 20 हजार रुपयांचा लाच घेताना आकडे आणि हरड या दोघांना अटक करण्यात आली. कल्याण तालुक्यातील वरप येथील एका बांधकाम कंपनीच्या जमिनीबाबतचे हरकरतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी पडताळणी दरम्यान तहसीलदार यांनी लाचेची मागणी केली होती. त्यांनी 1 लाख रुपये शिपायाकडे देण्यास सांगितलं होतं.

दरम्यान 1 लाख रुपये ठरले असताना शिपाई हरड याने स्वत:सह ऑफीस स्टाफकरिता अतिरिक्त 20 हजारांची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत विभाग ठाणे यांच्याकडे दिली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यानंतर 1 लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना शिपाई हरड याला रंगेहाथ पकडण्यात आलं.

ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Print Friendly, PDF & Email
Share