हॉर्न मधून भारतीय संगीत ऐकू येणार, नितीन गडकरी यांचा महत्वपूर्ण निर्णय..!
वाहनांमुळे वायुप्रदूषण तर होतेच, पण ध्वनीप्रदूषणही वाढलेय. कर्णकर्कश हाॅर्नमुळे चालकांसोबतच सामान्य नागरिकही हैराण होतात. मात्र, लवकरच हा त्रास कमी होणार आहे. वाहनांच्या हाॅर्नमधून लवकरच सुमधूर भारतीय वाद्यांचे संगीत ऐकू येणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. वाहनांच्या हॉर्नचा कर्कश आवाज बदलून, त्याऐवजी भारतीय संगीताचा वापर करण्याचा विचार सुरु आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच तसा अध्यादेश काढणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
? कर्कश हॉर्नची फॅशन:
सध्या मोठ्या आवाजातील हाॅर्नची फॅशनच आली आहे. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक जण गरज नसताना गाडीला कर्कश हॉर्न बसवितात. त्यामुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच; शिवाय त्याचा आरोग्यावरही परिणाम होताे. त्यामुळे हॉर्नचा उद्देश पूर्ण व्हावा, पण त्याच्या आवाजाचा त्रास होऊ नये, यासाठी गडकरी यांनी ही कल्पना मंत्रालयाला सुचविली आहे.
पुढील काळात वाहनांना तबला, पेटी, तानपुरा, बासरी यांसारखे संगीत असणारे हॉर्न बसविण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याने जाताना, वाहनांतून सुमधूर संगीत कानावर पडले, तर आश्चर्य वाटून घेऊ नका..!