शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक..!
महाराष्ट्रात आता कोरोनाची लाट बऱ्यापैकी ओसरली आहे. शिवाय ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु केले जाण्याचे संकेत आहेत. त्याच वेळी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आल्याने लवकरच शाळांची घंटा वाजण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत पालकही सकारात्मक आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सने हिरवा कंदिल दिल्याशिवाय राज्यातील शाळा सुरु केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘चाइल्ड टास्क फोर्स’चे सदस्य समीर दलवाई यांनी शाळा सुरु करण्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळांनी पूर्ण तयारी केली असल्यास शाळा उघडण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे.’
लसीकरण नि शाळा सुरू होण्याचा संबंध नाही
डॉ. दलवाई म्हणाले, की ‘ऑक्टोबरपासून लहान मुलांचे लसीकरण सुरू होणार असले, तरी लसीकरणाचा नि शाळा सुरू करण्याचा मात्र कोणताही संबंध नाही. मुलांना कोरोना संसर्ग झाला, तरी तो सौम्य स्वरुपात असतो. मात्र, प्रौढांना होणारा संसर्ग गंभीर आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे.’ मुलांच्या लसीकरणाचा नि शाळा सुरु करण्याचा संबंध नाही. मात्र, मुलांचे लसीकरण करणेही गरजेचे आहे. शाळा सुरु करण्यासाठी मात्र मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन हेच नियम पाळावे लागणार आहेत, असेही ते म्हणाले.
मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागेल
ते म्हणाले, की ‘कोविडमुळे ही मुले दीड वर्षांपासून घरात आहेत. शाळा सुरू करताना, या मुलांच्या मानसिकतेचाही विचार करावा लागणार आहे. सुरुवातीच्या काळात अभ्यास एके अभ्यास न करता, मुलाचे ‘सोशल रिहॅबिलिटेशन’ कराले लागेल. शिफ्टनुसार मुलांना शाळेत बोलवावे लागेल.’ राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्स सकारात्मक आहे. मात्र, त्याच वेळी विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे, असे डाॅ. दलवाई यांनी नमूद केले.