अवैध दारूविक्री बंद करण्याची महिलांनी मागितली ओवाळणी

प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक पोलिस ठाण्यात तालुक्यातील विविध गाव संघटनेतर्फे ‘खाकी विथ राखी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची व चंद्रपूर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर अंकुश लावण्याची ओवाळणी मांगीतली.
पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक बोंडसे,पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह २० पोलिस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शंकरपूर, पळसगाव, आकापूर, वासाळा व शहरातील विविध वार्डांतील १८ महिलांनी पोलीस बांधवाना राखी बांधून आपापल्या गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीकडे पोलीस बांधवांचे लक्ष वेधले.
शंकरनगर व पळसगाव या दोन्ही गावात अवैध दारूविक्री बंद आहे. मात्र, परिसरातील काही गावांमध्ये अवैध दारूविक्री सुरु आहे. यामुळे या दोन्ही गावातील महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी विनंती शंकरनगर व पळसगाव या दोन्ही गावातील महिलांनी पोलिस दादांकडे केली. वासाळा गावात जवळपास १० ते १२ अवैध दारूविक्रेते सक्रिय असून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री सुरु आहे. पोलिसांनी कारवाई करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी वासाळा येथील महिलांनी केली. तसेच आरमोरी शहरातील विविध वार्डात अवैध दारूविक्री सुरु आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने अवैध दारू येत आहे. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, एकूणच सर्व गावातील व शहरातील अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याची ओवाळणी यावेळी विविध गावातील महिलांनी मांगीतली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक बोंडसे यांनी गावातील महिलांनी दारू पकडून पोलिस स्टेशनला माहिती द्यावी. तसेच अवैध दारूविक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास महिलांनी सहकार्य केल्यास अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी करणे पोलिस विभागास शक्य होईल, असे सांगितले.

Print Friendly, PDF & Email
Share