लहान मुलांना कोरोना लस ऑक्टोबरपासून, NTAGI ची परवानगी

ZyCoV-D लशीचं नाव

देशातील 12 ते 17 वर्षं वयोगटातील लहान मुलांना कोरोनाविरोधी लस ऑक्टोबर महिन्यापासून मिळणार आहे. 

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राला मार्गदर्शन करणाऱ्या नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के.अरोरा यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिलीये.

गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने Zydus Cadila च्या, ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीच्या भारतात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती.

भारतात जानेवारी महिन्यापासून कोव्हिडविरोधी लसीकरणास सुरूवात झालीये. मात्र, उपलब्ध असलेल्या लशी 18 वर्षावरील लोकांसाठी आहेत. Zydus Cadila ची ZyCoV-D ही पहिलीच लस आहे जी 12 ते 17 वर्षं वयोगटातसुद्धा दिली जाऊ शकते. 

ऑक्टोबरपासून लहान मुलांचं लसीकरण 

Zydus Cadila च्या ZyCoV-D या कोरोनाविरोधी लशीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी गेल्या आठवड्यात आपात्कालीन वापराची परवानगी दिली होती.

औषध निर्मिती करणारी कंपनी Zydus Cadila ने ऑक्टोबर महिन्यापासून लस भारतात उपलब्ध होईल अशी माहिती दिली होती. 

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत बोलताना नॅशनल टेक्निकल अॅडव्हायसरी ग्रूपचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, “12 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना ही लस ऑक्टोबरपासून उपलब्ध होण्यास सुरू होईल. त्याचसोबत प्रौढ व्यक्तीदेखील ही लस घेऊ शकतात.”

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, भारतात 12 ते 17 वर्षं वयोगटातील मुलांची संख्या 12 कोटींच्या आसपास आहे. 

डॉ. अरोरा पुढे म्हणतात, “मुलांना ही लस उपलब्ध करून देण्याआधी, जी मुलं आजारी आहेत. ज्या मुलांना सहव्याधी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लिस्ट आणि प्लान बनवण्याची तयारी सुरू आहे.”

भारतात 1 टक्क्याच्या आसपास लहान मुलं सहव्याधी किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मिळतेय. 

“पण, सहव्याधी नसलेल्या निरोगी मुलांना प्रौढांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लस देण्यात येईल,” असं डॉ. अरोरा ANI शी बोलताना म्हणाले.

Share