50 हजारांपेक्षा जास्त धनादेशला द्यावा लागणार तपशील, अन्यथा क्लिअर होणार नाही चेक

जर तुम्ही प्रत्येक कामात चेकचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता येथून पुढे 50 हजारांवरील धनादेशासाठी तुमचा तपशील द्यावा लागणार आहे. जर तुम्ही तपशील दिला नाहीतर बँक तुमचे चेक रिजेक्ट करु शकते. बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू करण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश बँका 1 सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी करतील. आरबीआयने ऑगस्ट 2020 मध्ये चेक ट्रान्झॅक्शन सिस्टम (CTS) साठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम जाहीर केली होती.

चेक डिटेल्सला व्हेरिफाय करणे आवश्यक:
पॉझिटिव्ह पे मेकॅनिझम अंतर्गत तुम्ही जारी केलेला चेक तुमचाच आहे की नाही? हे तपासता येणार आहे. यामध्ये चेक जारी करण्याची तारीख, 6 अंकी चेक क्रमांक, रक्कम, लाभार्थ्यांचे नाव इत्यादींचा समावेश आहे. बँक शाखेला भेट देऊन किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे याची माहिती दिली जाऊ शकते. काही बँका ग्राहकांना एसएमएस, एटीएम किंवा ईमेलद्वारे माहिती देण्याची सुविधाही देत आहेत.

आरबीआयने गेल्या वर्षी जारी केली होती गाईडलाईन्स:
आरबीआयने गेल्या वर्षी यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केले होते. संबंधित बँक आपल्या खातेधारकांच्या इच्छेनुसार 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेवरील चेकसाठी या सुविधा लागू करु शकतात. परंतु, 5 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या धनादेशांसाठी बँका अनिवार्य करू शकतील. त्यामुळे आपल्या बँकेने पीपीएस लागू केले की नाही? किंवा कधी लागू केली जाईल हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

अॅक्सिस बँकेने पीपीएसला केले अनिवार्य:
अॅक्सिस बँकेसह इतर अनेक बँकांनी जास्त रक्कमेवरील चेकसाठी पीपीएस अनिवार्य केले आहे. त्यामुळे ग्राहकांना चेक दिल्यानंतर बॅकेंला नेट/मोबाईल बँकिंगद्वारे किंवा शाखेत जाऊन चेक डिटेल्स द्यावे लागेल. परंतु, ज्यांच्याजवळ या सुविधा नाहीत त्यांना या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महिंद्रा कोटक बँकांनी पीपीएसला अनिवार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

1 जानेवारीपासून नियमांची अंमलबजावणी होणार होती
आरबीआयने सर्व बँकांना 1 जानेवारी 2021 पासून पीपीएस लागू करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे धनादेश प्रक्रियेत होणाऱ्या फसवणूकीपासून बचाव करता येणार आहे. यासंदर्भात अनेक बँकांनी ग्राहकांना संदेश आणि ईमेल पाठवत सतर्क केले आहे. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांना एक ईमेल पाठवला आहे.

इंटरनेट बँकिंगद्वारे व्हेरिफिकेशन करता येणार:
इंटरनेट बँकिंगद्वारे चेकचे व्हेरिफिकेशन करता येणार असून यासाठी ग्राहकाला नेट बँकिंगवर लॉगिन करावे लागेल. यानंतर सर्व्हिसेसची निवड केल्यानंतर चेक सर्व्हिसेसमध्ये जाऊन पॉझिटिव्ह पेला निवडावे लागेल. ज्या नावाचा धनादेश देण्यात आला आहे, त्याचा तपशील तुम्हाला टाकावा लागेल. पॉझिटिव्ह पे सिस्टीमद्वारे तुम्ही पेमेंटसाठी मर्यादादेखील सेट करू शकता.

Share