सद्यस्थितीत राज्याला कुठलाही अलर्ट किंवा इशारा नाही, घाबरु नका : आरोग्यमंत्री राजेश टोपे

वृत्तसंस्था / जालना : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केला आहे. पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे नीती आयोगाचे म्हणणे आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, नीती आयोगाचा अलर्ट आजचा नाही, केंद्राला आलेले पत्र जून महिन्यातील आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.
टोपे म्हणाले की, सद्यस्थितीत राज्याला कुठलाही अलर्ट किंवा इशारा नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली. आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारी पूर्ण केली आहे. त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, तिसऱ्या लाटेचा अंदाज आणि निरीक्षण सुरू असून त्या अनुषंघानेच मंदिर शाळा उघडण्याचा निर्णय होईल.
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगाने व्यक्त केला. आता सोबतच देशाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या नॅशनल इंस्‍टीट्यूट ऑफ डिझास्‍टर मॅनेजमेंटच्या तज्ञांनी देखील एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

Share