यावर्षी देखील राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारली
वृत्तसंस्था / मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथके आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक सध्या सुरु आहे. दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचे पाऊल उचलावे लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहिदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही.
बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्न आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांने करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचे जाहीर करतात. मग, आंदोलन करायचे असेल तर कोरोना विरोधात करा ना.”
“बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालके अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावे. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगाने जे सांगितले, ते लक्षात घेतले पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्याने वाढवलेली नाही.”, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.