केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ : न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
वृत्तसंस्था / रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केले आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे वृत्त समोर येत आहे.