केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बिरसी विमानतळावरून हवाई सेवेच्या उद्घाटनासाठी येणार : खा.सुनील मेंढे
भंडारा 13: बिरसी विमानतळावरून सुरु होणा-या व्यावसायिक उड्डाणासाठी 3 ते 4दिवसात परवाने मिळणार असून सप्टेबर 2021 च्या मध्यापर्यंत विमानसेवेचा लाभ पूर्व विदर्भ व नजीकच्या मध्य प्रदेशाला होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री मा.सिंधियाजी यांनी या हवाई वाहतूक सेवेच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. असे खा.मेंढे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
केंद्रीय मंत्र्यासोबत झालेल्या या बैठकीत खा. सुनील मेंढे यांनी एक निवेदन दिले असून या भेटी दरम्यान बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व भू-संपादन या महत्वाच्या विषयावर चर्चा झाली असून महाराष्ट्र शासनासोबत समन्वय साधून विषय मार्गी लावण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी अधिका-यांना दिले. हवाई सेवा सुरु झाल्याने पूर्व विदर्भाचा मोठा विकास होणार असून येथील कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेचा लाभ होणार आहे.
यूपीए सरकारच्या काळा पासून रखडलेल्या या विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाभिमुख योजनेमुळे बिरसी विमानतळ देशाच्या इतर भागाशी हवाई वाहतुकीने जोडला जाणार आहे. खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, नितीनजी गडकरी व मा.ज्योतिरादित्य सिंधिया यांचे मनापासून आभार मानले.