जिल्हातील डेल्टाचे दोन्ही रुग्ण बरे,गावात होणार तपासणी

गोंदिया : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक भाग म्हणून कोरोना विषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात करण्यात येत आहे. याच अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने डेल्टा प्लसच्या अनुषंगाने चाचणीसाठी पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे जून महिन्यात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल बुधवारी (दि.११)  आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. मात्र हे दोन्ही रुग्ण आता पूर्णपणे बरे झालेले आहे.

डेल्टा प्लसच्या अनुषंगाने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेतून कोरोना बाधित रुग्णांपैकी २० रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे नियमित पाठविले जातात.जून महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे २० कोरोना बाधित रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त झाला. यात दोन रुग्ण डेल्टा प्लसचे आढळले. यापैकी १ रुग्ण सडक अर्जुनी आणि १ रुग्ण सालेकसा तालुक्यातील आहे.

अहवाल प्राप्त होण्यास दोन महिन्याचा कालावधी लागला. अहवाल येईपर्यंत हे दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे फारशी काळजी करण्याची गरज नाही. मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने दोन रुग्णांचा अहवाल डेल्टा प्लसच्या अनुषंगाने पॉझिटिव्ह आल्याने हे रुग्ण आढळलेल्या गावातील सर्वच नागरिकांचे नमुने तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने या दोन्ही गावात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share