मेडल मोदीजींनी आणले का ? : बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान मोदींचा मोठ्या आकाराच्या फोटोने नाराजी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा, कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्यासह टोक्योहून मायदेशी परतलेल्या भारतीय ऑलिम्पिक पथकाचे सोमवारी नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, माजी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय राज्य क्रीडामंत्री निशित प्रामाणिक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केलीय. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
झाले असे की पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी नवी दिल्लीमधील हॉटेल अशोकामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनाही आपली मत व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचेच लक्ष वेधले. मंचावरील या पोस्टवर सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूंचे फोटो होते. मात्र हे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या आकारापेक्षा फारच छोटे असल्याचे दिसत होते. यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.

Share