रानभाज्या मानवी आरोग्याला उपयुक्त-सौ उषाताई शहारे (माजी जिल्हा परिषद सदस्या, गोंदिया)
प्रहार टाईम्स
देवरी 09- आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मानवी आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून पारंपारिक आणि दुर्मिळ रानभाज्या दैनंदिन आहारामध्ये समावेश करावा. विविध औषधी रानभाज्या व वनउपज अन्न मानवी आरोग्यास उपयुक्त आहेत. रानभाज्या सेवनामुळे मानवी शरीर सशक्त होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सदस्या सौ उषाताई शहारे यांनी केले आहे.
९ ऑगस्ट हा क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्य साधून महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत तालुका कृषी विभाग देवरी यांच्या वतीने रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .या रानभाज्या महोत्सवास प्रमुख मार्गदर्शक म्हणून माविमचे महिला मंडळाचे महिला अध्यक्षा सौ हेमलता वालदे,तालुका कृषिअधिकारी जी.जी.तोडसाम, चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी चंद्रकांत कोळी,देवरीचे मंडळ कृषिअधिकारी विकास कुंभारे ,मा.पालीवालजी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर रानभाज्या महोत्सवात देवरी तालुक्यातील असंख्य आदिवासी महिला, शेतकरी उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळून येतात. रानभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला आढळून येत असून औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत. रानभाज्या मध्ये कंदभाज्या- उदाहरणार्थ पातुर भाजी, उंदीरकानी, करांदे ,वडघर, कडूकंद, कोणताही अळू इत्यादी. हिरव्या भाज्या- तांदूळजा, काटेमाठ कुडा, काकडा, कोरडा, कुर्डू, घोळ कवळा, लोथ, इत्यादी. फळभाज्या- उदाहरणात करटोली, वाघेडी, चिचुर्डी,पायार, मोह, कपाळफोडी, काकड इत्यादी. फुलभाजी- कुडा,शेवळ, उळशी,तसेच विदर्भातील तरोटा,मोहफुल कुडाच्या शेंगा वगैरे असंख्य रानभाज्या या भागांमध्ये आढळून येतात.
सदर रानभाज्या महोत्सवामध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त देवरी तालुक्यातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील एकूण 40 प्रकारच्या दुर्मिळ व औषधी रानभाज्या चे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच प्रत्येक रानभाजीचे व वनउपज यांना स्वंयपरिचय फलक लावण्यात आले होते. जेणेकरून आदिवासी शेतकऱ्यांना आणि आणि शहरी भागात वास्तव्य करत असणाऱ्या नागरिकांना रानभाज्यांची माहिती मिळावी आणि रानभाज्यांचे महत्त्व त्यांना समजावे याची दक्षता घेण्यात आले होते. तसेच
देवरी तालुका रानभाज्या महोत्सवामध्ये विविध रानभाज्यांचे नमुने ठेवण्यात आले होते.. तसेच विक्री साठी स्टाँल लावण्यात आले होते. त्यानुसार तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांनी रानभाज्यांचे मानवी आहारातील महत्त्व विशद केले व मानवी आरोग्यास गुणकारी असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढून माणूस कोणत्या आजाराला बळी पडणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी व शहरात राहणाऱ्या नागरिकांनी रानभाज्या खरेदी करून दैनंदिन आहारामध्ये समावेश करण्याबाबत आवाहन केले. त्यामुळे आदिवासी महिलाना रानभाज्या गोळा करुन बाजारात विक्री केल्याने स्वंयरोजगार उपलब्ध झाल्याने आर्थिक उन्नती साधता येईल. देवरीचे मंडळ कृषी अधिकारी विकास कुंभारे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सदर महोत्सवास तालुक्यातील आदिवासी महीला शेतकरी, कृषिपर्यवेक्षक, कृषिसहाय्यक यानी परिश्रम घेतले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक. चिचगडचे मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक शिवकुमार येडाम यांनी केले तर आभार प्रदर्शन आत्मा विभागाचे अरविंद उपवंशी यानी मानले.