दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा : अकरावी सीईटी परीक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई : अकरावी प्रवेशासाठीची सीईटी संदर्भात हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाकडून सीईटी रद्द करण्यात आली आहे. २८ मे चा यासंदर्भाताल अध्यादेश हायकोर्टाने रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारने निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे.
राज्य सरकारने अकरावी प्रवेशाबाबत २८ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकाला स्थगिती देण्याची मागणी करत अनन्या पत्की या आयसीएससीच्या विद्यार्थिनीने ही याचिका आपले वडील ॲड. योगेश पत्की यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. २८ मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्य सरकारने दहावीची परिक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशासाठी कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (सीईटी) घेणार असल्याचे जाहीर केले.
दहावीचे मुल्यांकन कसे केले जाईल याचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय. मात्र, तरीही साल २०२०-२१ च्या शैक्षणिक वर्षावर आधारीत अंतर्गत मुल्यांकनावर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी घेतली जाईल. आणि सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.