Tokyo Olympics 2021 : पदकविजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव

टोकियो  -टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंवर आता बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे. विविध राज्यांतील सरकारने तसेच उद्योगजगत व अन्य क्रीडाप्रेमी संस्थांनी खेळाडूंना नोकरी, रोख रकमेचे पारितोषिक तसेच विविध सुविधा बक्षीस म्हणून देण्याच्या घोषणा केल्या आहेत.

भारताने हॉकीमध्ये तब्बल 41 वर्षांनंतर पदक पटकावले आहे. तर बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक मिळवले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रजतपदक मिळवून दिले. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना सरकारी नोकरी तर, कोणाला 1 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच आणखीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत.

ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 16 ऑगस्ट रोजी पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूंचा सन्मान करणार आहेत. तर रेल्वेकडूनदेखील ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांनाही रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.

वेटलिफ्टिंगध्ये रजतपदक मिळवून देणाऱ्या मणिपूरच्या मीराबाई चानूला एएसपी म्हणून नोकरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी चानूला 1 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी राज्याच्या ऑलिम्पिकपटूंना प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

भारतीय हॉकी संघाचा खेळाडू नीलकांता शर्माला मणिपूर आणि मध्य प्रदेश सरकारकडून बक्षीस देण्यात येणार आहे. नीलकांताला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज यांनी 1 करोड रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

तर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी नीलकांताला 75 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे नीलकांता हा रेल्वेमध्ये टीसीचे काम करत होता. त्याला आता मणिपूरमध्येच खेळाशी निगडीत सरकारी नोकरी देण्यात येणार आहे.

Share