ममतां’नी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाल्या, ‘देशातील लोकशाही…’

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय नेत्यांची भेट घेतली आहे. आज ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. याआधी ममता बॅनर्जी यांनी ‘१० जनपथ’ येथे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. सोनिया गांधींच्या निवासस्थानी जवळपास तासभर त्यांच्यात चर्चा झाली. त्याआधी मंगळवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर सौजन्य भेट असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. नरेंद्र मोदींविरोधात २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठी मोट बांधण्यासाठी ममतांचा हा दौरा असून तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तृणमूल काँग्रेसच्या मुखपत्रातही ‘एबार शपथ, चलो दिल्ली’ याबाबतची घोषणा देण्यात आली आहे.

शरद पवारांसोबतच्या या भेटीनंतर तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना त्या म्हणाल्या की, मी शरद पवारांशी बोलले. ही भेट यशस्वी झाली. आम्ही राजकीय कारणांसाठी भेटलो होतो. लोकशाही प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशीच आमची घोषणा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या देखील पाठिशी आहोत. आम्ही या ठिकाणी दर दोन महिन्यांनी येत राहू.

त्यांनी गेल्या मंगळवारी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यासहित काँग्रेसचे नेते आनंद शर्मा आणि कमलनाथ यांची भेट घेतली होती. त्यांनतर त्यांनी काल सायंकाळी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीपूर्वीच आज ममता बॅनर्जी यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली आहेत. ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींविरोधात आपला एल्गार व्यक्त करताना म्हटलंय की, संपूर्ण देशात ‘खेला’ होईल. ही एक सततची प्रक्रिया आहे. जेंव्हा २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुका असतील, तेंव्हा ती निवडणूक ‘मोदी विरुद्ध देश’ अशीच असेल.

२०२४ साली तुम्ही विरोधकांच्या एकजुटीचा चेहरा असाल का, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर दिलंय की, मी काही राजकीय ज्योतिषी नाहीये, हे सगळं त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. इतर कोणी नेतृत्व केल्यास मला काही हरकत नाही. जेव्हा या विषयावर चर्चा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ शकतो. मी निर्णय थोपवू शकत नाही.

Share