गोंदिया विमानतळावरील तांत्रिक अडचणी दूर होताच सेवा सुरु करू- नागरी उड्डयणमंत्री

गोंदिया 30 : येथील बिरसी विमानतळावरून प्रवासी व माल वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने असलेल्या दोन अडचणींवर लवकरात लवकर उपाय शोधून वाहतूक सुरू करू. असे आश्वासन केंद्रीय नागरि उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खा.सुनील मेंढे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. त्यामुळे लवकरच गोंदिया विमानतळावरून वाहतूक प्रवासी वाहतूक सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात सुनील मेंढे यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील गोंदिया जिल्ह्यात असलेल्या विमानतळाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला थेट केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उत्तर दिले. उडान या अभिनय योजने अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी सज्ज असलेले मात्र प्रत्यक्षात वाहतूक सुरू न झालेले किती विमानतळ देशात आहेत. वाहतूक सुरू करण्यासंदर्भात गोंदिया विमानतळाच्या परवानगीचा विषय केव्हापर्यंत पूर्ण होऊन प्रत्यक्ष वाहतूक सुरू होईल आणि गोंदिया विमानतळावरून मालवाहतुकीची व्यवस्था म्हणजेच कार्गो सेवा सुरू होणार आहे का? असे प्रश्न पुरवणी मागण्यांच्या वेळी खासदार सुनील मेंढे यांनी विचारले. 

प्रश्नाला उत्तर देताना मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी देशात उडान योजने अंतर्गत 370 हवाई मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्षात 359 मार्गांवर वाहतूक सुरु झाली असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेअंतर्गत 59 नवीन विमानतळ उभारण्यात आले आहे. देशातील एकेक नागरिक हवाई सफर करू शकेल, असा कल्याणकारी विचार घेऊन ही योजना कार्यान्वित केली जात असल्याचे ते म्हणाले. 

गोंदिया विमानतळाच्या संदर्भात बोलताना उडान नियोजित योजनेच्या चौथ्या भागात गोंदिया विमानतळावरून दोन चार्टर विमानांच्या माध्यमातून गोंदिया ते हैदराबाद आणि गोंदिया ते इंदोर अशा मार्गांवर वाहतूक केली जाणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी एका खासगी कंपनीने सहमती दर्शविली आहे. मात्र सध्या दोन अडचणी यात असून रणवे अँड सिक्युरिटी एरियासाठी जमीन हस्तांतरणाची गरज आहे. जून 2021 भारतीय विमान वाहतूक महासंचालनालयाचे एक पथक जाऊन यासंदर्भात तपासणी करून आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 

यासोबतच जो मार्ग निश्‍चित केला आहे त्या मार्गावर मध्यपासून उत्तरपूर्वी भारतादरम्यान कंपनीकडे एकच विमान उपलब्ध आहे. हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लावू. गोंदिया विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याचा मानस असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मिळणारा प्रतिसाद पाहता चर्चा करून मालवाहतूक सेवा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आश्‍वासनही या वेळी मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले.

Share