पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट : वाहन, हॉटेल, लॉज, गुन्हेगार व तडीपारांची तपासणी; अवैध धंद्यांवर कारवाई
ऑपरेशन ऑल आऊटमध्ये 351 पोलीस अधिकारी-कर्मचार्यांचा समावेश
गोंदिया 30 : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात 28 व 29 जुलै रोजी जिल्हाभर एकाचवेळी ऑपरेशन ऑल आऊट राबविण्यात आले. यात पोलीस विभागाने वाहने, हॉटेल्स, लॉज व अवैध धंद्यांची तपासणी केली. तसेच कारागृहातून सुटून आलेले गुन्हेगार व तडीपार यांची चौकशी करून अनेक गुन्ह्यांबाबत कारवाई केली आहे. या अभियानात एकूण 351 पोलीस अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
सदर ऑपरेशन ऑल आऊट अभियानात अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, गोंदिया, तिरोडा, आमगाव, देवरी येथील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार सहभागी झाले होते. या अभियानात जिल्ह्यातील एकूण 39 पोलीस अधिकारी व 312 पोलीस कर्मचारी असे एकूण 351 अधिकारी-कर्मचार्यांनी भाग घेतला होता. ऑपरेशन ऑल आऊटदरम्यान एकूण 9 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. संशयित हॉटेल्स, लॉज, कारागृहातून सुटलेले गुन्हेगार, वॉन्टेड, तडीपार आदींची चौकशी व तपासणी करण्यात आली.
ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत नाकाबंदी दरम्यान एकूण 232 वाहनांची तपासणी करण्यात आली. 3 वाहनांविरुद्ध मोटार वाहन अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील एकूण 19 हॉटेल्स-लॉज यांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात नोंद असलेल्या एकूण 86 गुन्हेगारांच्या संशयास्पद हालचालींची तपासणी करण्यात आली. तसेच 10 फरार आरोपी व 10 वॉन्टेड आरोपींसह एकूण 20 आरोपींवर कायदेशीर कारवाईसाठी चौकशी करण्यात आली.
ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान जिल्ह्यातील एकूण 16 गुंडवृत्तीचे व कारागृहातून सुटून आलेल्या 35 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच विविध गुन्ह्यातील एकूण 16 तडीपारांवर कायदेशीर करवाईसाठी त्याच्या घरी तपासणी करण्यात आली. यात 3 तडीपार आपल्या घरी आढळले. त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली. 2 आरोपींविरुद्ध कलम 122 मुपोका अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
या अभियानांतर्गत दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण 4 गुन्हे दाखल करण्यात आले व 5 समन्स जारी करण्यात आले. ऑपरेशन ऑल आऊट यशस्वीपणे राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे कौतुक केले.