आरशातले प्रतिबिंब चे विश्व कवी सुधाकर गायधनीच्या हस्ते थाटात प्रकाशन
देवरी: डॉ.वर्षा गंगणे लिखित ‘आरशातले प्रतिबिंब’ या कवितासंग्रहाचे नागपूर येथे साहित्य विहार च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात थाटात प्रकाशन झाले.संग्रहाचे प्रकाशन विश्वकवी,ज्ञानयोगी पुरस्कार प्राप्त डॉ.सुधाकर गायधनी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर रातुम नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पंकज चहांदे ,साहित्य विहार संस्थेच्या अध्यक्षा डॉ.आशा पांडे, सचिव डॉ.अर्चना अलोणी,प्रज्ञा आपटे, सौ.गायधनी उपस्थित होते.
डॉ.वर्षा गंगणे यांचा हा पाचवा कविता संग्रह असून सोळावे पुस्तक आहे.या संग्रहास झाडीपट्टीच्या बहिणाबाई ,जेष्ठ कवयित्री सौ.अंजनाबाई खुणे यांची प्रस्तावना असून समाजमनाचे चित्रण करणाऱ्या कवितांचा यात समावेश आहे.
कवयित्री गोंदिया शिक्षण संस्थेद्वारे संचालित मनोहरभाई पटेल महाविद्यालय देवरी येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख पदावर मागील २८वर्षांपासून कार्यरत आहेत. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या कार्याने गोंदिया जिल्ह्याचे नाव पुढे आले आहे. देवरी सारख्या ग्रामीण व दुर्गम क्षेत्रात राहून लिखाण करणे ही तालुका तसेच जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.