आठ लाख बक्षीस असलेल्या नक्षली दाम्पत्याचे आत्मसमर्पण
गडचिरोली- 30 नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश प्राप्त झाले आहे. ८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका जहाल नक्षल दाम्पत्यांनी गडचिरोली पोलीसांसमोर आत्मसमर्पण केले आहे .विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा (वय ३२)रा. बोटेझरी, पोमके गॅरापत्ती ता. कोरची जि.गडचिरोली व कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोबाची (वय ३३) रा. गौडपाल ता मानपूर जि. राजनांदगाव (छ.ग.) यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे . विनोद बोगा व कविता कोवाची हे दोघे पती-पत्नी असून विनोद बोगा हा कोरची दलममध्ये एसीएम पदावर दलम डॉक्टर म्हणुन कार्यरत होता व त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती.
विनोद बोगा यांचेवर खूनाचे १३, चकमकीचे २१ , जाळपोळ १ व इतर ५ असे गुन्हे दाखल असुन पत्नी कवितावर चकमकीचे ५, जाळपोळ १ व इतर ३ असे गुन्हे दाखल होते. शासनाने विनोद बोगा याचेवर ६ लाख रूपयाचे तर कविता कोवाची हिचेवर २ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या जहाल नक्षलींचे आत्मसमर्पण घडवुन मुख्यप्रवाहात आणण्याची कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली धानोराचे उपविभागिय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांनी पार पाडुन मोठी भुमिका बजावली आहे.