ट्रॅक्टर चोरांना अटक : नवीन प्रशासकीय इमारतीतून आरोपींनी पळविले होते 3 ट्रॅक्टर
गोंदिया, 21 : तहसीलदार आदेश डफळ यांच्या आदेशावरून दासगावचे मंडळ अधिकारी डी.एच. पोरचेट्टीवार यांनी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर रेतीसह जप्त केले होते. ते ट्रॅक्टर नवीन प्रशासकीय इमारत गोंदियाच्या आवारात आणून ठेवण्यात आले होते. ही कारवाई 16 जुलै रोजी करण्यात आली होती. मात्र त्याच दिवशी तिन्ही ट्रॅक्टर अज्ञात आरोपींनी चोरून नेले. याबाबत गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 379 अन्वये तीन ट्रॅक्टर चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. गोंदिया शहर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून सदर ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक केली.
सविस्तर असे की, ट्रॅक्टर मॉडेल क्रमांक 333, इंजिन क्रमांक 01154, चेचिस क्रमांक 923014125672; दूसरा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर मॉडेल क्रमांक 834 एक्सएम, इंजिन क्रमांक 1008 एसएबी 01368 व तिसरा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 35/एजे-1179 रेतीसह जप्त करून नवीन प्रशासकीय इमारत परिसरात जमा करण्यात आले होते. मात्र चोरांनी संधी साधून तिन्ही ट्रॅक्टर चोरून नेले होते.
असे पकडले ट्रॅक्टर चोरांना
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दोन गुन्ह्यातील तीन ट्रॅक्टर चोरीचे प्रकरण उघडकीस आणण्याकरिता शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. दरम्यान तपास करणार्या पोलीस पथकाला 17 जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की, एक ट्रॅक्टर मुकेश योदोराव बिसेन (वय 36) रा. रामनगर गोंदिया याने चोरून नेले. त्यावरून पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले व चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरबाबत विचारणा केली. यावर त्याने सदर ट्रॅक्टर नेल्याची कबुली दिली. त्याला भादंविच्या कलम 379 च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडून चोरीस गेलेला स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर (एमएच 35/एजे 1179) ट्रालीसह जप्त करण्यात आला.
तसेच चोरीस गेलेला दूसरा आयएसआर कंपनीचा ट्रॅक्टर मॉडेल क्रमांक 333, इंजिन क्रमांक 01154, चेचिस क्रमांक 923014125672 ग्राम हरदीटोला, जि. बालाघाट (मध्य प्रदेश) येथे मिळून आला. सदर ट्रॅक्टरसुद्धा जप्त करण्यात आला, पण आरोपी लोकेश डेनिराम पाचे (वय 22) रा. साकळी, ता. खैरलांजी (हल्ली मुक्काम पुजारीटोला, कासा) हा फरार झाला होता. त्याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली.
तसेच याच गुन्ह्यात आरोपी असलेला दीपक उर्फ बटन बंडू मरसकोल्हे रा. तेढवा, ता.जि. गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर मॉडेल 934 एक्सएम जप्त करण्यात आला. सदर आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. सदर आरोपींकडून चोरीस गेलेले तिन्ही ट्रॅक्टर (अंदाजे किंमत 9 लाख रुपये) स्थानिक गुन्हे शाखा व गोंदिया शहर पोलीस पथकाने संयुक्त कारवाई करून हस्तगत केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहराचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलीस हवालदार मिश्रा, पोलीस नाईक मेहर, शेख, तूरकर, पोलीस शिपाई रहांगडाले, पोलीस शिपाई केदार, मानकर, पोलीस नाईक उइके, शेंडे, एस. बिसेन, मेश्राम, चव्हाण, वाय बिसेन, रहांगडाले, विठ्ठले आदींनी केली.