चिखलाने माखलेल्या ट्रॅक्टर्समुळे रस्ते हरवले , ग्रामीण लोक भोगतात असह्य यातना…!

◾️मुजोर ट्रॅक्टर्स मालक चालक देत आहेत अपघातांना आमंत्रण….

डॉ. सुजित टेटे
देवरी 21:
तालुक्यात नुकतीच खरीप खंगामाच्या शेती विषयक कामाला सुरुवात झाली असून तंत्रज्ञानाच्या युगात ट्रॅक्टर्स चा गावोगावी मोठ्या प्रमाणात वापर वाढलेला आहे. ट्रॅक्टर्स चा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात शेतीविषयक कामात वापर वाढल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांपासून ते मोठ्या शेतकऱ्यापर्यंत ट्रॅक्टर हाच सर्वोत्तम मानला जात असून त्याची मागणी वाढली आहे.

वाढत्या ट्रॅक्टर्सच्या उपयोगामुळे शेतीचे काम झाल्यावर चिखलाने माखलेले ट्रॅक्टर्स दळणवळणाच्या पक्क्या रस्त्यावर बेजबाबदारपणे चालविण्यात येत असल्यामुळे ग्रामीण भागातील पक्के रस्ते हरवून गेले असून शेतातील चिकट माती रस्त्यावर आल्यामुळे अपघातात वाढ झाली असून ग्रामीण भागातील लोकांना असहय त्रास सहन करावा लागत आहे.

चिखलाने माखलेले ट्रॅक्टर्समुळे रस्त्यावर चिखल साचलेले असून ट्रॅक्टर्स मालक आणि चालक मनमर्जीपणे काम करीत असल्यामुळे यामध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनता भरडली जात आहे. यामुळे अपघातात जीवितहानी झाली तर याचे जबाबदार ट्रॅक्टर चालक आणि मालक असणार असे म्हणणे चुकिचे ठरणार नाही.

सदर प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन ट्रॅक्टर्स मालक आणि चालकांना सुरक्षाविषयक सूचना करण्यात याव्या आणि सूचनांचे पालन न करणाऱ्या ट्रॅक्टर्स मालकावर आणि चालकावर कायदेविषयक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातील जनतेने केलेली आहे.

Share