“महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही”: नाना पटोले
मुंबई :मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन करणाऱ्या एएचएल म्हणजेच एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचं मुख्य कार्यालय मुंबईतुन हलवण्याचा निर्णय अदानी ग्रुपने घेतला आहे. तसेच अदानी यांच्या या निर्णयामुळे आता या प्रकरणात राजकीय पडसाद देखिल उमटताना पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अदानी यांना मुख्य कार्यालय हलवण्यासंदर्भात गंभीर इशारा यापुर्वीच दिला होता. आता या प्रकरणात काँग्रेसही मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असल्याचं दिसुन येत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई विमानतळाचं मुख्यालय गुजरातला हलवण्याच्या प्रकरणात आक्रमक भुमिका घेतली आहे.
गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे असं म्हणत त्यांनी आता अदानी समुहाविरूद्ध महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता यासंबंधी आणखी जास्त पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातील तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधल्याचं यावेळी पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, आज सामनातुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते, याबाबत नाना पटोले यांना विचारलं असता मी सामना वाचत नाही, त्यामुळे सामनावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, अशी स्पष्ट भुमिका नाना पटोलेंनी घेतली आहे.