Breaking: नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला राहुल गांधींचा हिरवा कंदिल

नवी दिल्ली 20: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपुर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुक स्वबळावर लढवण्याची भाषा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता नाना पटोले यांनी काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांची आज भेट घेतली आहे.

नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के पाटील यांनी आज राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तसेच या भेटी दरम्यान या नेत्यांंमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटी वेळी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांना स्वबळावर काँग्रेस लढल्यास कसा फायदा होऊ शकतो, याबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसला महाराष्ट्रात सध्या विस्ताराची व पक्ष मोठा करण्याची मोठी संधी आहे. त्याच पार्श्नभुमीवर नाना पटोलेंसह एच.के पाटील यांनी घेतलेली हि भेट महत्वाची असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. तसेच राहुल गांधी यांनी नानांच्या स्वबळाच्या नाऱ्याला हिरवा कंदिल दिल्याचं सध्या स्पष्ट झालं आहे, त्यामुळे आता काँग्रेस पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढेल, असं आता दिसुन येत आहे.

काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी बरोबर सत्तेत आहे, पण गेल्या काही दिवसांपासुन नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत कुरबुरी वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता राहुल गांधी यांनीच थेट स्वबळाला मंजुरी दिल्याने येणाऱ्या निवडणुकीत याचा काँग्रेसला फायदा होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share