गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस : गोविंदपूर पुलानजीक रस्ता गेला वाहून

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात काल मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेला गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पुलानजीकचा कच्चा रस्ता आज पावसाच्या पाण्याने सकाळी वाहून गेला. त्यामुळे गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गाचा संपर्क तुटला आहे.
मध्यरात्री पासून गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १८ किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर गावानजीक असलेल्या नाल्यावर नवीन पुलाचे व सिमेंट रोडचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पुलाच्या बांधकामानजीक वाहतुकीसाठी कच्चा रस्ता बनविण्यात आलेला आहे. गोविंदपूर परिसरात सुरु असलेल्या पूल बांधकामा नजीकचा कच्चा रस्ता मुसळधार पावसाने वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे व अनेक गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला आहे.

Share