अनिल देशमुखांचा अचानक दिल्ली दौरा

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले. ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्यानं अनिल देशमुख यांची धावाधाव सुरू झाली आहे. आता याच प्रकरणात मत सुनावणी सुरू आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत.

ईडी प्रकरणाबाबत आता कायदेविषयक सल्ला घ्यायला देशमुख दिल्लीला रवाना झाले आहे, अशी माहिती समोर आली आहे. देशमुख अटकपूर्व जामिनासाठी कायदेशीर सल्ला घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. तर काही राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनिल देशमुख आता सर्वोच्च न्यायालयात जाणार का याकडे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला नेऊन अटकेपासून संरक्षण मिळवण्याचा अखेरचा प्रयत्न अनिल देशमुखांचा असणार आहे.

देशमुख यांच्यावर दाखल केलेला खटला बेकायदेशीर आहे आणि कायदेशीर प्रक्रियेचा भंग करणारा आहे. कसाबसारख्या व्यक्तीलासुद्धा या देशात कायद्याच्या फायदा मिळाला आहे. इथे प्रत्येकाला कायद्यानुसार संरक्षण दिलं जातं, असं वकील अमित देसाई यांनी सुनावणी दरम्यान म्हटलं होतं. अनिल देशमुख यांच्याविरोधात खटला चालवण्यापूर्वी केंद्रीय एजन्सीने राज्य सरकारची मंजूरी घेतली नव्हती, असं वकील अमित देसाई यांनी सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयात सांगितलं.

दरम्यान, संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली होती. आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी प्रश्न विचारले असताना संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांनी सहकार्य केलं नाही. यामुळे आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात दोघांना चौकशीसाठी अटक केली. त्यानंतर या दोघांच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Share