अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काल अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी म्हणजे नागपूरमध्ये ईडीने छापे टाकले होते. त्यासोबतच त्यांच्या वरळीच्या निवासस्थानावरही छापेमारी सुरू होती. आता याच प्रकरणात पुढील कारवाई करताना ईडीने दोन जणांना अटक केल्याने अनिल देशमुख यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालंडे आणि पर्सनल असिस्टंट म्हणजेच स्वकिय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही करावाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी प्रश्न विचारले असताना संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांनी सहकार्य केलं नाही. यामुळे आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणात दोघांना चौकशीसाठी अटक केली आहे, अशी माहिती ईडीने दिली आहे.

ईडीचे अधिकारी आले होते. त्यांना सहकार्य करण्यात आलं. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही, असा सवाल अनिल देशमुख यांनी केला आहे. मुंबईतील 10 बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना 4 कोटी रूपये दिले असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ईडीने अनिल देशमुख यांच्या घरी छापा टाकला होता.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी आयुक्त पदाच्या खुर्चीवर होते तेव्हा त्यांनी आरोप का केले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित करत एनआयएच्या तपासात सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला. तसेच माझ्याकड़ून केंद्रीय तपास यंत्रणाना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

Share