खळबळजनक ! मास्कविना बॅंकेत प्रवेश करणाऱ्या ग्राहकावर सुरक्षारक्षकाकडून गोळीबार
उत्तरप्रदेशच्या बरेलीमधील घटना
लखनौ 26– मास्कविना बॅंकेत प्रवेश करण्याची कृती एका ग्राहकाला भलतीच महागात पडली. संतापलेल्या सुरक्षारक्षकाने केलेल्या गोळीबारात तो ग्राहक गंभीर जखमी झाला. मोठी खळबळ उडवून देणारी ती घटना उत्तरप्रदेशात घडली.
उत्तरप्रदेशच्या बरेलीमधील बॅंक ऑफ बडोदाच्या शाखेत कुठल्याशा कामासाठी राजेश कुमार (वय 35) हे ग्राहक दाखल झाले. त्यांनी मास्क परिधान केला नसल्याने बॅंकेचे सुरक्षारक्षक केशवप्रसाद मिश्रा याने त्यांना रोखले. त्यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मिश्राकडे दुर्लक्ष करत कुमार यांनी बॅंकेत प्रवेश केला. त्यामुळे संतापलेल्या मिश्राने गोळीबार केला.
त्यामध्ये जखमी झालेल्या कुमार यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात हलवण्यात आले. संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बॅंकेच्या सुरक्षारक्षकाला अटक केली.
बॅंकेने घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली. जखमी ग्राहकाला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी बॅंकेने दाखवली. तसेच, ग्राहकावर गोळीबार करणाऱ्या सुरक्षारक्षकाला सेवेतून मुक्त केले.