राज्यात ‘डेल्टा प्लस’ चा धोका आणि ‘तिसऱ्या लाटेचा’ इशारा : सोमवारपासून जुनेच निर्बध नव्याने लागू होणार
वृत्तसंस्था / मुंबई : रुग्णसंख्या घटल्यामुळे तीन आठवड्यांपूर्वी शिथिल केलेले राज्यातील निर्बंध करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या (डेल्टा प्लस) प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे जुनेच निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत. मुंबईतील निर्बंध आणखी तीन महिने कायम ठेवण्याचे संकेत सरकारने दिले आहेत.
कठोर केलेल्या निर्बंधांनुसार सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. नागरिकांना सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही. सर्व मॉल्स बंद राहतील. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना किमान तीन महिने तरी दिली जाणार नाही, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कठोरपणे लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
रुग्णसंख्या कमी झाल्यावर राज्य सरकारने पाचस्तरीय रचना तयार केली होती. त्यानुसार रुग्णसंख्या, संसर्गदर आणि प्राणवायूच्या उपलब्ध खाटा या आधारे शहरे आणि जिल्ह्यांची श्रेणीरचना दर आठवड्याला निश्चित के ली जात होती. गेल्या तीन आठवड्यांत पाचस्तरीय रचनेनुसार निर्बंध शिथिल करण्यात आले होते, परंतु निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर गर्दी झाल्याचे आणि नागरिकांनी नियमोल्लंघन सुरू केल्याचे सरकारला आढळले, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे.
करोना रुग्णसंख्येत झालेली वाढ, काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक असलेला संसर्गदर, करोना विषाणूचा उत्परिवर्तित ‘डेल्टा प्लस’ हा प्रकार आणि त्याचे रत्नागिरी, जळगावसह अन्य जिल्ह्यांमध्ये आढळलेले रुग्ण हे सर्व मुद्दे लक्षात घेऊनच निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.