पुंजणे जाळणारे आरोपी अजूनही मोकाट….. जिल्ह्यात धान कापल्यानंतर मळणी करण्यावर बहुतांश शेतकऱ्यांचा कल

धानाचे पुंजणे जाळल्याची घटना आजही ताजी


भुपेन्द्र मस्के/ प्रहार टाईम्स
गोंदिया ५: देवरी तालुक्यातील चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे अज्ञात इसमाने जाळल्याची घटना मागील वर्षात घडली. ही घटना अजुनही शेतकऱ्यांच्या मनाला भेगा पाडुन जाते. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या शेतातील धानाचे पुंजणे सुरक्षीत ठेवण्यासाठी त्यांच्यावर शेतात पहारा देण्याची वेळ आली आहे. या वर्षी धान कापल्यानंतर मळणी (चुराई) करण्यावर बहुतांश शेतकऱ्यांचा कल देवरी तालुक्यातील चिचगड क्षेत्रात दिसुन येतो.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील धान कापणी आणि मळणीचा हंगाम सुरू आहे.बऱ्याच शेतकऱ्यांनी धानाची कापणी करुन त्याची मळणी करण्यासाठी शेतात धानाचे पुंजणे तयार करुन ठेवणे ही पंरपरा आहे. शेतकरी मजूर आणि मळणी यंत्र मिळाल्यानंतर धानाची मळणी करु अशा बेतात शेतकरी असतात. मागील वर्षी चिचगडसह सहा गावातील ४० हून अधिक शेतकऱ्यांचे ८० धानाचे पुंजणे जळाले. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेचे पंचनामे सुरू असतानाच लगेचच चिचगडपासून १२ कि.मी.अंतरावर असलेल्या कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे जाळण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. याची माहिती गावकरी आणि शेतकऱ्यांना होताच त्यांनी शेतातकडे धाव घेत पुंजण्यांना लागली आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ही आग रात्रीच्या सुमारास लावली असल्याने संपूर्ण धानाचे पुंजणे जळून राख झाले होते. यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले होते. शेतकऱ्यांनी वर्षभर रक्ताचे पाणी करुन आणि राबराब राबून पीक घेतले. धानाची मळणी करुन बँका आणि देणीदारांची देणी फेडू अशा विचारात शेतकरी होते. मात्र धानाचे पुंजणे जळाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली . पुन्हा दोन दिवसाच्या अंतराने पुन्हा हीच घटना घडल्याने ज्या शेतकऱ्यांचे धानाचे पुंजणे शेतात आहेत ते दहशतीत होते त्यांना रात्री शेतात पहारा देण्याची वेळ आली होती. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी देवरीचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. चिचगड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविली आहे. कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.
यावर शासनाकडून तुटपुंजी मदत मिळाली. त्यामुळे या हंगामात धान कापल्यानंतर मळणी करण्याकडे शेतकरी वळला आहे. त्यामुळे मळणी मशिन व शेतमजुरांचा तुटवडा जाणवत असल्याचे चित्र क्षेत्रात आहे

पुंजण्यांना आग लावणारा कोण?
हे रहस्य अजूनही गुपित…!

चिचगडसह सहा गावातील ८० अधिक धानाच्या पुंजण्यांना अज्ञात इसमाने आग लावली. यात शेतकऱ्यांचे ४५ लाख रुपयांचे नुकसान होते. त्यानंतर पुन्हा कडीकसा येथील १३ शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पुंजणे जाळण्यात आले. धानाचे पुंजणे जाळण्यामागील नेमके कारण काय आणि पुंजणे जाळणार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेने पोलिसांसमोर सुध्दा आव्हान उभे ठाकले आहे.
अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये धानाचे पुंजणे तयार करुन ठेवण्यात आले असून या घटनेमुळे ते सुध्दा सुरक्षीत राहण्याची शक्यता नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता शेतात रात्रीच्या वेळी पहारा देण्यास सुरूवात केली होती व सध्याही तिचं परिस्थिती आहे.

मात्र आरोपी अजूनही मोकाट असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळू शकला नाही. हे वास्तव नाकारता येत नाही.

Share