ध्यास गुणवत्तेचा: जि. प. शिक्षण विभाग, गोंदिया चा नाविन्यपूर्ण उपक्रम ‘चला करूया अभ्यास’ येतोय विद्यार्थ्यांच्या दारी

दि. 28 जून 2021 पासून होणार अंमलबजावणी….

गोंदिया 23: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने मागील दिड वर्ष विद्यार्थी शाळेपासून दूर राहिले. या दरम्यान शासन व जिल्हास्तरावरुन विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे अविरत कार्य सुरु होते.

पण विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी Online शिक्षण पध्दतीमुळे शिक्षणापासून दूर गेलेले असून शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांमध्ये आवड कमी झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. नविन शैक्षणिक सत्र २०२१-२२ मध्ये सुध्दा कोरोनाची लाट अधिक जीवघेणी होत चाललेली आहे. शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे यावर्षी “शाळा सुरु विद्यार्थ्याविना” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मा. शिक्षण संचालक यांच्या दि. १४ जून २०२१ च्या पत्रानुसार दि. २८ जून २०२१ पासून विदर्भातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत न बोलविता त्यांच्याकरिता शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत “चला करुया अभ्यास” हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उपक्रमाची कार्यवाही-
गोंदिया जिल्हयात शैक्षणिक सत्र २०२१-२२ ची सुरुवात दिनांक २८ जून २०२१ पासून होत आहे. कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे शाळा नियमित सुरु होण्यास विलंब होत असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर जायला नको, त्यांची शिक्षणाची गोडी कमी व्हायला नको. सन २०२०-२१ मध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणा पासुन दुरावले आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षण घेऊ न शकल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी व गरीब विद्यार्थी यांच्यात शिक्षणातील प्रचंड अनास्था निर्माण झाली असून ते दुर करणे अत्यावश्यक झाले आहे.

शाळा प्रारंभाच्या पहिल्या दिवसापासून इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचा भाषा, गणित, विज्ञान व इंग्रजी
विषयाचा नियमित अभ्यास करुन घेण्यासाठी वर्गशिक्षकांद्वारे दररोज विद्यार्थी भेटी घेऊन त्यांचा नियमित अभ्यास घेऊन शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आहे. मुख्याध्यापकांद्वारे शाळेतील शिक्षकांच्या भेटीचे नियोजन व संनियंत्रण करणे आहे. केंद्र प्रमुखांद्वारे शिक्षकांच्या भेटीत आलेल्या अडचणींवर मार्गदर्शन करून गृह मार्गदर्शनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्य
करणे आहे.

जिल्हास्तरावर कोअर टीमची निर्मिती करण्यात आली असून या टीमद्वारे सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, दिशानिर्देश देण्याची व वेळोवेळी उपक्रम मूल्यमापन करुन सुधारणा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमाचे जिल्हास्तरीय समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, व सहा समन्वयक म्हणून समग्र शिक्षा चे जिल्हा समन्वयक बाळकृष्ण बिसेन, यांची नेमणूक करण्यात आली आहे.

उपक्रमाचा कालावधी :
दिनांक २८ जुन २०२१ ते पुढे ४५ दिवस ब्रिजकोर्स आधारीत मार्गदर्शन व मूल्यामापन होणार असून १० ऑगष्ट २०२१ पासून पुढे शैक्षणिक दिनदर्शिकेवर आधारीत मार्गदर्शन व मूल्यमापन करण्यात येणार आहे.

मूल्यमापन :
सदर उपक्रमाचे पाक्षिक मूल्यमापन करण्यात येणार असून केलेल्या मूल्यमापनावर आधारीत विद्यार्थ्याची स्तरनिश्चिती करण्यात येणार आहे. वर्ग शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्तरनिहाय मार्गदर्शन व समुपदेश करण्यात येणार असून पर्यवेक्षकीय यंत्रणेद्वारा विद्याथ्र्यांच्या स्तर वाढीसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. गूगल लिंकद्वारे शाळानिहाय विद्यार्थ्याचे मूल्यमापन संकलित करण्यात येणार आहे.

शिक्षण विभाग जिल्हा परिषद गोंदिया प्रत्येक विद्यार्थ्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबध्द असल्याने उपरोक्त नाविण्यपुर्ण उपक्रम गोंदिया जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या १०३९ शाळांमध्ये दि. २८ जून २०२१ पासून राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षिय यंत्रणेव्दारे उपक्रमाची अंमलबजावणी प्रत्यक्ष शाळास्तरावर करण्यात येणार असून दर १५ दिवसांनी जिल्हा कार्यालयामार्फत उपक्रमांच्या फलनिष्पत्तीबाबत आढावा घेण्यात येईल.

तरी शिक्षण विभागातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व केन्द्रप्रमुख यांच्या स्तरावरुन उपक्रम अंमलबजावणीबाबत योग्य नियोजन करुन प्रत्येक विद्यार्थ्यास उपक्रमाचा लाभ मिळेल याकरिता प्रयत्न करण्यात यावे असे आदेश जिल्हा परिषद गोंदिया चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे यांनी परिपत्रक काढून दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share