गोंदिया व भंडारा ज़िल्हयात लवकरच निवडणुकचे बिगुल
राजकिय पक्षांबरोबर हौशी अपक्षही लागले कामाला
डॉ. सुजित टेटे
गोंदिया,दि.०४ : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर शासन आणि प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय म्हणून विविध उपाय योजना केल्या जात आहे. याच पार्श्वभुमीवर गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दि.१७ मार्च रोजी दिले होते.त्या आदेशाला काल 3 नोव्हेंबर रोजी रद्द करीत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 11 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप हरकती नोंदवायच्या आहेत.प्राप्त झालेल्या हरकती व आक्षेपांवर 27 नोव्हेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी आणि त्यानंतर 2 डिसेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना व आरक्षण राजपत्रात जाहिर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
यापुर्वी राज्य निवडणूक आयोगाने २८ फेब्रुवारीपासून जि.प.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार ५ मार्चला प्रारुप प्रस्तावास मान्यता, १३ मार्चला सर्कल निहाय आरक्षण सोडत, १६ मार्चला प्रभाग रचनेची अधिसूचना आणि १६ ते २३ मार्च दरम्यान प्रभाग रचना आणि आरक्षण नोंदविणे, ३० मार्चला आक्षेपावर सुनावणी आणि ३ एप्रिलला अंतिम प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात येणार होते. या कार्यक्रमानुसार सोमवारपासून आरक्षणावर आक्षेप नोंदविण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली होती. मात्र देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निवडणुका या भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पाडणे लोकशाहीत अपेक्षित आहे.याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील जि.प.व पं.स.निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेत आदेश काढले होते.ते आदेश काल 3 नोव्हेंबर 2020 च्या पत्रानुसार रद्द झाले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या धामधुमीचा मार्ग मोकळा झालेला आहे.