नागपूरकरांना मोठा दिलासा, 24 तासात शहरात कोरोनामुळे फक्त एका रुग्णाचा मृत्यू

नागपूर : गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र संपूर्ण देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेत तर कोरोनाने रौद्र रूप प्राप्त केलं होतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला. एकेकाळी नागपूरमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता नागपूरकरांना कोरोनातून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

नागपूरमध्ये 24 तासात शहरी भागात फक्त एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर ग्रामीण भागात 2 मृत्यूची नोंद झाली आहे. नागपुरमधील मृतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असताना पाहायला मिळत आहे. नागपूरकरांना कोरोनामधून आता दिलासा मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे.

मागच्या आठवड्यातील नागपुरमधील कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा 0.15 टक्के असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागपूरमधील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत आहेत. पण सध्या कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असली तरी प्रशासनाकडून नागरिकांना सर्व नियम पाळण्याच आवाहन करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्या 2 हजार 062 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 9 हजार 001 नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सध्या महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात झाली आहे. तसेच विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सूट देण्यात येत आहे.

Share