भंडारा जिल्ह्यात कोरोना जनजागृतीचा अनोखा रुटमार्च

भंडारा : कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली असली तरी गाफील राहून चालणार नाही. धोका अजूनही टळला नसून आता अधिक काळजी घेणे व सतर्क राहण्याची खरी गरज आहे. शासनाच्या मार्गदर्शन तत्वानुसार अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले असून आता भंडारा जिल्हा लेव्हल एक मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रशासन व पोलीस विभागाने ‘रुटमार्च’ काढून कोरोना नियम पाळण्याबाबत जनजागृती केली. कोरोना जनजागृतीचा हा कार्यक्रम अनोखा ठरला आहे.


कोरोना जनजागृती रूटमार्चची सुरुवात 7 जून रोजी भंडारा शहरातून करण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी मुख्य बाजारपेठेत रुटमार्चच्या माध्यमातून नागरिकांना नियम पाळण्याबाबत आवाहन केले. कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी पूर्णपणे ओसरली नाही. त्यामुळे नियमांचे पालन करून उद्योग व्यापार करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले होते. त्या आवाहनाला नागरिक व व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि आज आपला जिल्हा लेव्हल एक मध्ये आहे.
रूटमार्च जनजागृतीचा हाच पॅटर्न जिल्हाभर राबविण्यात आला. गेले आठवडाभर प्रशासन व पोलीस विभागाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रूटमार्चचे आयोजन केले. साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, मुख्याधिकारी व स्थानिक अधिकारी या रूटमार्च मध्ये सहभागी झाले होते. कोरोनाचा प्रोटोकॉल पाळणे व दुकानात गर्दी न होऊ देणे याबाबत जागृती करण्यात आली. त्यासोबतच मोठ्या गावांमध्येही रूटमार्च आयोजित करण्यात आला.


कोरोनाची दुसरी लाट आरोग्याच्या दृष्टीने नुकसानकारक ठरली असून मागील तीन महिन्यात रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. ही बाब लक्षात घेता शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध घालून दिले होते. त्यामुळे रुग्ण संख्या कमी झाली. व्यवसाय व्यापार व दैनंदिन जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी शासनाने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून निर्बंध शिथील केले आहेत. जिल्ह्यातील व्यापार व्यवसाय सुरू झाले असले तरी काही ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब गंभीर असून व्यापारी प्रतिष्ठाण सुरू करण्याबाबत ठरवून दिलेले नियम न पाळणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश जनजागृती दरम्यान देण्यात आले.
1 जून ते 13 जून दरम्यान जिल्ह्यात कोरोनामुळे केवळ एक मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.81 एवढा झाला आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 01.22 टक्क्यांवर आला आहे. भंडारा जिल्हा आता लेव्हल एक मध्ये आला असून आजपासून अधिक प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात जिल्हा व पोलीस प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व रूटमार्चच्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीचा हा परिणाम आहे. मात्र तरीसुद्धा मास्क वापरणे, वारंवार हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर पाळणे या नियमातून कोणतीही सूट देण्यात आली नाही. नागरिकांनी गाफील न राहता, सतर्क राहून काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.

Share