पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली! रेल्वे रुळावर पाणी
मुंबई : राज्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. कुठे संततधार, तर कुठे मुसळधार सरी कोसळताना पाहायला मिळाल्या. त्यातच मुंबईत दाखल झालेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिली. मागील काही तासांपासून मुंबईसह उपनगरांत आणि शेजारील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस कोळसत आहे. मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे.
#WATCH | Maharashtra: Severe waterlogging at Kings Circle in Mumbai, due to heavy rainfall. #Monsoon has arrived in Mumbai today. pic.twitter.com/PI2ySwhBCR
— ANI (@ANI) June 9, 2021
मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात आजपासून म्हणजेच, 9 ते 13 जून दरम्यान, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली.
मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणंही अवघड झाले आहे. तर पहिल्या पावसाने लोकल सेवेलाही ब्रेक लावला. रेल्वे रुळावर पाणी आल्याने मध्य आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवा थांबवण्यात आली आहे.