केंद्र सरकारकडून दुचाकीच्या हेल्मेटबाबत ‘हे’ नवे नियम लागू
नवी दिल्ली | देशभरामध्ये दुय्यम दर्जाचे आणि बनावट हेल्मेट वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने नवे नियम लागू केले आहेत. त्यानुसार आता बनावट हेल्मेट वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येणार आहे.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बनावट आणि दुय्यम दर्जाचे हेल्मेट विक्रीस उपलब्ध आहेत. परंतु, त्यामुळे दुचाकीस्वाराच्या जीवास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवे नियम लागू करून दुय्यम दर्जाचे हेल्मेट वापरणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
आयएसआय मार्क बीआयएस सर्टिफाइड हेल्मेट वापरणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जर आपल्या हेल्मेटवर आयएसआय मार्क नसेल आणि बीआयएस सर्टिफिकेशन देखील नसेल तर आपण दंडास पात्र आहात. ज्या हेल्मेटवर बीआयएस सर्टिफिकेशन नसेल अशा दुचाकीस्वारांना दंडाची तरतूद करण्यात आली आहे.आयएसआय मार्क नसणाऱ्या आणि बनावट हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना 5 लाखांचा दंड आणि एक वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो. दरम्यान, दुचाकीस्वारांच्या सुरक्षेसाठी आणि बनावट हेल्मेट वापरणे बंद व्हावे, यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकीस्वारांनी अधिकृत आणि सुरक्षित हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.