नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात; जात प्रमाणपत्र न्यायालयाने केलं रद्द

मुंबई : खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अखेर उच्च न्यायालयामार्फत रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला आहे.

वडिलांचं सर्टिफिकेट रद्द केल्यानंतर आजोबांच्या नावाने खासदार नवनीत राणा यांनी सर्टिफिकेट बनवलं होतं. परंतू, उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी कॉन्स्टिट्युशन फ्रॉड केल्याचं म्हणत त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे.

आम्ही न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 4 वर्षानंतर निकाल लागला असला तरी आम्ही न्यायालयाच्या निकालावर खूश आहे, असं अडसूळ म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात गेले तरी त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द होईल, त्यामुळे अखेर न्यायाचा विजय झाला, असं देखील आनंदराव अडसूळ म्हणाले.

दरम्यान, अमरावती हा लोकसभेसाठी एससी राखीव मतदार संघ होता. त्या मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटं असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. त्यामुळे आता त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share