महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

पुणे | महाराष्ट्रात ठराविक वेळेपूर्वीच मान्सूनचं आगमन झालं आहे. महाराष्ट्रातील तब्बल 9 जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. समाधानकारक पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांमध्येही दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

अलिबागमार्गे नुकतच पुण्यात मान्सूनचं आगमन झालं असून सोलापूर मार्गे मान्सून तेलंगणा, आंध्र प्रदेशकडे आगेकूच करत आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, उस्मानाबाद आणि रायगड या नऊ जिल्ह्यांमध्ये मान्सूनने आगमन केलं आहे.मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकऱ्यांनीही पावसाळी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार लवकरच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल होईल.

दरम्यान, दरवर्षीपेक्षा चार दिवस लवकर यंदा पुण्यात मान्सून दाखल झाला आहे. तसेच रत्नागिरीच्या बंदरावरून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. त्याबरोबरच येणाऱ्या 24 तासात महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Share