ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड़ रही है, कोविड टीका चाहिए तो आत्मनिर्भर बनो! -राहुल गांधींची खोचक टीका

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यासह भाजप-संघाच्या काही नेत्यांच्या ब्लू टिक ट्विटरने काढून टाकल्या. त्यावरून भाजप आणि ट्विटरमध्ये तणातणी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सरकारला ब्लू टिकचं पडलं आहे. लोकहो, तुम्हीच तुमच्या लसीची व्यवस्था करा, अशी खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून ही टीका केली आहे. ब्लू टिकसाठी मोदी सरकार संघर्ष करत आहे. कोविडची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. तसेच या पोस्टला प्रायोरिटी हा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. यातून त्यांनी सरकार कशाला प्राधान्य देतंय हे सूचित केलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या या खोचक टीकेला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

ट्विटरनं काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं वैयक्तिक ट्विटर हँडल आधी अनव्हेरिफाईड केलं आणि नंतर पुन्हा व्हेरिफाईड केलं. ट्विटरनं असं का केलं ते आधी सांगितलं नाही. पण पुन्हा ब्लू टिक प्रस्थापित केल्यानंतर का हटवली ते सांगितलं. पण नायडूंना आधी जो धक्का दिला तो फक्त त्यांनाच दिला असं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही काही नेत्यांना ट्विटरनं अनव्हेरिफाईड केलं. म्हणजे अकाऊंटची सत्यता काढून टाकली आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरूण कुमार आणि सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या ट्विटर हँडलचा समावेश आहे. नायडूंची ब्लू टिक का हटवली ते ट्विटरनं स्पष्टपणे सांगितलं, पण संघाच्या नेत्यांची का हटवली ते मात्र सांगितलेलं नाही. त्यामुळे मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यातला संघर्ष आणखी वाढला आहे.

Share