बँक एजेंटने केला 17.38 लाखांचा अपहार : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या गोंदिया शाखेतील प्रकार

गोंदिया 4 : दि भंडारा अर्बन को-ऑपरेटिव बँक लि.च्या गोंदिया शाखेत एजेंट म्हणून काम करणार्‍या एका व्यक्तीने स्वतःच्या फायद्यासाठी बँक खातेधारकांकडून अधिकची रक्कम घेतली व कमी रक्कम बँकेत भरून लाखो रुपयांचा अपहार केली. याबाबतचा गुन्हा आज 4 जून रोजी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, आरोपी बँक एजेंटने 1 जुलै 2019 ते 23 जुलै 2020 दरम्यान दि भंडारा अर्बन को ऑपरेटिव बँकेच्या गोंदिया शाखेत डेली डिपाजीट एजेंटशीप करताना हा घोळ केला आहे. 1 जुलै 2019 ते 23 जुलै 2020 दरम्यान त्याने 72 पिग्मी खातेदारांकडून एकूण 5 लाख 71 हजार 264 रुपये बँकेत जमा केले. मात्र खाते पासबूकमध्ये 22 लाख 40 हजार 160 रुपयांच्या नोंदी केल्या आहेत. 

सदर बँक एजेंटने कमी रक्कम भरून तब्बल 17 लाख 38 हजार 640 रूपयांचा अपहार केला आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारकांची फसवणूक व बँक प्रशासनाशी धोका झाला आहे. या प्रकरणात बँक व्यवस्थापक अनिल भास्कर झामरी (वय 53) रा. मामा चौक, गोंदिया यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम 420, 408 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

Share