प्रीवेडिंगवाल्यांना त्रास देऊ नका, ते हनिमूनलासुद्धा इथेच आले पाहिजेत- अजित पवारांचा टोला

मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. सध्या लग्नाच्या सीझनमुळे अनेक कपल प्रीवेडिंगसाठी कोकणाकडे जात आहेत. मात्र तिथे त्यांना प्रीवेडिंगसाठी शुट करताना रोखलं जात असल्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कपल्सला चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला आहे.

आजकाल लग्न ठरल्यावर प्रीवेडिंग शूट केलं जातं. अनेक मुलं मुली श्रीवर्धनमध्ये येतात. शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाल्याचं कानावर पडतं. त्यांना इथे रोखलं जातं त्यामुळे ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत जातात पण तसं करु नका, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार रायगड-श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

प्रीवेडिंगला आलेल्या जोडप्यांना इतकी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनिमूनलाही इथंच आलं पाहिजे. हनिमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही इथं यायला हवं. त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, संरक्षण द्यायला हवं. यामुळे उत्पन्नाचं साधन तयार होईल, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, कोकणाबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही आत्मियता आहे. या भूमीवर त्यांचं खूप प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करण्याची त्यांची इच्छा असल्याचं अजित पवारांन सांगितलं. त्यासोबतच ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही, अशी समजही पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

Print Friendly, PDF & Email
Share