सुरजागड प्रकल्पाच्या कामावर जाल तर जीवाला मुकाल; नक्षल्यांची पत्रके टाकून मजुरांना धमकी

गडचिरोली: जिल्ह्यातील बहुचर्चित अश्या सुरजागड लोह्खनिज प्रकल्पाचे उत्खननाचे काम मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरु झाले असले तरी नक्षलवाद्यांचा या प्रकल्पाला विरोध मावळण्याचे चिन्हे दिसत नाही.अश्यातच सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात नक्षल पत्रके आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या पत्रकात लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या कंपनीला मदत करण्याला लोकांना नक्षलवाद्यांनी पत्रकातून सावधानतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे येत्या काळात सुरजागड लोहखनिज प्रकल्पाला मदत करणारे नक्षलवाद्यांच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

लॉयड्स मेटल कंपनीच्या नावे लीज मंजूर असलेले लोहखनिज उत्खनन काम विविध संघटना, ग्रामसभा, नागरिकांच्या तीव्र आंदोलन व नक्षल चळवळीच्या विरोधामुळे गेल्या तीन वर्षापासून बंद होते. लॉयड्स मेटल कंपनीकडून यापुढील उत्खननाचे काम तमिळनाडूतील सेलम येथील त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. ली. कंपनीला पेटी कंत्राट देऊन लोहखनिज उत्खनन काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नेहमीच विकासाला विरोध करणारे नक्षलवादी लोहखनिजाचे उत्खनन सुरु झाल्यामुळे चवताळलेले आहे. त्यामुळे त्यांनी या परिसरात पत्रके टाकून या भागातील जनतेनी लोहप्रकल्पाला सहाय्य करू नये, अन्यथा जीवाला मुकावे लागेल. असे टाकलेल्या पत्रकातून तंबी दिली आहे.

नक्षलवाद्याने टाकलेल्या पत्रकात हिंदी भाषेत मजकूर आहे. गुरुपल्ली, एटापल्ली, पंधेवाही, जीवनगट्टा, कुनबेके भाईयो सुरजागड पहाडीपर काम को जाना जल्दसे जल्द बंद करो नकी मौत का हिस्सा बनो, दुबारा संदेश नही दिया जायेगा. भाकपा माओवादी भामरागड एरिया कॅमेटी अशा आशयाचा मजकूर पत्रकात नमूद आहे.

सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन आणि वाहतूकीचे काम त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेड, सेलम तामिळनाडू यांच्याद्वारे सुरू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री व काही विशिष्ट कामगार पहाडावर तळ ठोकून बसले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित परिसर दुर्गम आणि नक्षलग्रस्त असतानादेखील याठिकाणी कुठलीच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात नक्षलवादी व स्थानिक लोकांचा उत्खननाला विरोध बघता सुरजागड प्रकल्पाचे घोडे कुठपर्यंत जाणार हा येणारा काळच सांगणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share