महाराष्ट्रभर गोंधळ उडवून मंत्री विजय वडेट्टीवार नागपुरात!
वृत्तसंस्था /नागपूर : महाराष्ट्रात अनलॉक होणार, अशी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केलेले मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सध्या चांगलेच अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील 18 जिल्हे उद्यापासून पूर्णपणे उघडणार असल्याचं वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यानंतर हे सर्व प्रकरण चांगलंच पेटलं.
विजय वडेट्टीवार यांनी अनलॉक संदर्भात घोषणा केल्यानंतर ते तात्काळ नागपूरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध महाराष्ट्रात काढण्यात आलेले नाहीत तसेच आणि अनलाॅक संदर्भात निर्णय झाला नाही, तो प्रस्ताव विचाराधिन आहे, असं स्पष्टीकरण देण्यात आलं. त्यानंतर, संपूर्ण महाराष्ट्रभर एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, महाराष्ट्रभर गोंधळ उडवून मदत व पुनर्वसन मंत्री मात्र नागपूरला दाखल झाले व त्यांनी या सर्व गोष्टींचं खापर माध्यमांवर फोडलं. नियमांना तत्वतः मान्यता मिळाली, असं मला म्हणायचं होतं ते राहून गेलं. तसेच माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास करून बातम्या चालवल्या, असं देखील त्यांनी म्हटलं.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर संभ्रम निर्माण केल्यामुळे ठाकरे सरकार चांगलंच अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षानेही ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. या सर्व प्रकरणात सारवासारव करताना विजय वडेट्टीवार यांनी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील मी फक्त तत्वतः हा शब्द वापरायचा विसरलो, असं म्हणत वेळ मारून नेली. पण या सर्व गोष्टींमुळे सरकारमध्ये समन्वय नसल्याचं पाहायला मिळत आहे.