श्री चक्रधरांचा अहिंसावादी विद्रोह समजून घेणे गरजेचे – प्रा.मोहन बाभूळगावकर

सुदर्शन एम. लांडेकर

उपसंपादक प्रहारtimes

जगात झालेल्या अनेक विद्रोही क्रांत्या व बंडामागे हिंसेच स्वरूप दिसून येते पण सूमारे १२ व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी येथील वंचित,शोषीत,पिडीत व सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी प्रस्थापिताविरूद्ध अहिंसा मार्गाने केलेला विद्रोह आजच्या काळात प्रत्येक व्यक्तींनी समजून घेणे गरजेचे आहे असे विचार प्रा.मोहन बाभूळगावकर ( प्रसिद्ध वक्ते,लेखक, कवी व महानुभाव साहित्याचे अभ्यासक औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा आयोजित तथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी महोत्सवानिमित्त ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्राला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी आणी भुमिका या विषयावर ते बोलत होते.
सर्वज्ञ विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा ९ दिवसीय व्याख्यानमालेचे उद्घाटन कविश्वराचार्य माहूर पिठाधीश प.पू‌.प.म.श्री माहूरकर बाबा शास्त्री ( श्री देवदेश्वर संस्थान माहूर) यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पार पडले.
ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज यांच्या महान अशा ग्रामस्वच्छताविषयक कार्याची माहिती प्रत्यक्ष आचरणाद्वारे जणमाणसांत रूजवून त्यांच्या समाजोद्धारक विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा मागील ८ वर्षांपासून विदर्भातील विविध जिल्ह्यांतील अनेक गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवून समाजप्रबोधन करण्यात येत आहे. यावर्षी कोरोनासंकटामूळे दि. १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन व्याख्यानमाला सर्वज्ञ विचारमंच युट्युब चॅनल च्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून संपूर्ण देशभरातील नामवंत साहित्यिक, लेखक, संशोधक व सुप्रसिद्ध व्याख्याते विविध विषयांवर आपली मते, विचार व्यक्त करणारं आहेत. या व्याख्यानमालेला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे..

Share