शिक्षण आणि शहाणपण
शब्दांकन: शुभंम शिवनकर मो.9309122594
अगदी बालपणापासूनच आपल्यापैकी जवळपास सर्वांनीच शाळेतल्या भिंतींवर वाचलेला एक प्रचलित वाक्य- ‘शिक्षण आणि शहाणपण याचा काहीही संबंध नसतो.’ जीवनातल्या या अत्यंत महत्वाच्या वाटणाऱ्या दोन गोष्टींमध्ये आता जर काहीही संबंध नसेल तर जीवनात फक्त शिक्षणच घेतलं आणि शहाणे व्हायचे सोडून दिले तर चालेल का ?… किंवा मग शिक्षणच घेतलं नाही आणि फक्त शहाणेच झालो तर चालेल का ? हे महत्वाचे प्रश्न आपल्याला पडतात. याही पुढे जाऊन विचार केल्यास आपल्याजवळ शिक्षण आणि शहाणपण यापैकी कोणतीही एकच गोष्ट असली तर आयुष्यात यशस्वी होता येते का ? आणि जर होता येत असेल तर आपल्या यशाचा स्तर काय असेल ? यासारखे प्रश्न एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीला विचार करायला भाग पाडतात. तेव्हा चिकित्सक पद्धतीने याबद्दल विचार करणे अत्यंत निग्रहाचे ठरते.
खूप वर्षांपूर्वी एक विद्यार्थी होता. बालपणापासूनच अभ्यासू. खूप अभ्यास करणारा. इतका कि, एकदाचं जेवण करायचं राहून गेलं तरी चालेल पण अभ्यास बुडायला नको या वृत्तीला प्राणपणाने जपणारा. शाळेतल्या घटक चाचण्यांपासून ते अगदी वार्षिक परीक्षांमध्ये नेहमी पहिला येणारा.
अभ्यासाचा नुकसान होतो म्हणून मैत्री करण्यास टाळणारा, अभ्यास बुडतो म्हणून मैदानावर कधीही खेळायला न जाणारा. दहावी-बारावीला जिल्ह्यातून- बोर्डातून येणारा. रोजच्या जगण्यात त्याला लोकांशी मैत्री करणे, साधेसुधे आर्थिक व्यवहार करणे, मुलींशी बोलणे यासारख्या गोष्टी करतांना नेहमी कमी पडणारा.. पण “आयुष्यात आपल्यायला या गोष्टी थोडीच करायच्या आहेत…आपल्याला तर फक्त अभ्यास करायचा आहे” असे म्हणून या समस्यांना सपशेलपणे टाळणारा. पुढे आयुष्यात तो खुप शिकला… पदवीधर झाला. स्वाभाविकतः नोकरीवर रुजू झाला. आतापर्यंतचे आयुष्य जरी तो जगला असला तरी खरे आयुष्य आता सुरु झालं होतं. आतापर्यंत जी माणसं त्याने पुस्तकात वाचली होती ती जिवंत रूपाने त्याच्याशी संवाद साधायला लागली. बोलायला लागली. प्रश्न विचारायला लागली…पण आता या प्रश्नांची उत्तरे द्यायला तो गांगारायला लागला. किराणामालाच्या दुकानदाराशी भाव करतांना कमी पडायला लागला. नवीन मित्र बनत नाहीत म्हणून संतापायला लागला. आपल्याला धड बोलता येत नाही…आपण बोलायला लागलो तर कुणी ऐकत नाही म्हणून तो चिडायला लागला. एकंदरीत म्हणायचं झालं तर आयुष्यात तो उच्चशिक्षित नक्की झाला पण शहाणा व्हायला चुकला. शिक्षण घेऊन जरी तो कीर्तिमान झाला तरी ती कीर्ती जपण्यासाठी रोजच्या गुड मॉर्निंग ते गुड नाईट दरम्यान लागणारा वागण्यातला शहाणपण मिळवण्यात तो अपयशी ठरला. सांगायचा अर्थ एवढाच कि एखादी व्यक्ती जरी खूप शिकलेली असली..गुण पत्रिकांवर/मार्क-शिट्स वर जरी शंभरपैकी-शंभर टक्के छापले असेल आणि रोजच्या जगण्यात वागावं कसं, बोलावं कसं, बोलतांना शब्दांना तोलावं कसं हि जाणीव आणि समज नसेल किंवा याउलट एखादी व्यक्ती खूप शहाणी असेल पण शिक्षितच नसेल तर मात्र जीवनाचा वांदा होण्याच्या शक्यता वाढतात.
आयुष्य हे समतोलपणे चालणारे तराजू आहे, ज्याच्या एका पारड्यात शिक्षण आणि दुसऱ्या पारड्यात शहाणपण ठेवता येते. एखाद्याकडे भरपूर शिक्षण आहे मात्र शहाणपण नसेल तर आयुष्याचा समतोल साधता येणार नाही. एखादी व्यक्ती खूप शहाणी आहे तर ती खूप शिक्षित असलीच पाहिजे आणि शिकलेली व्यक्ती शहाणी असलीच पाहिजे अशी अशाही बाळगता येत नाही. म्हणूनच शिक्षण आणि शहाणपण याचा काहीही संबंध नसतो. या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या साधनांसारख्या असल्या तरी त्यांचे साध्य मात्र एकच आहे, ते म्हणजे- व्यक्तिमत्त्वाचा आणि व्यक्तीचा विकास…आणि विकास एका रात्री घडत नसतो तर निरंतरपणे केल्या जाणाऱ्या कष्टाने ते साध्य होत असते. अर्थातच तसे कष्ट घेताही येतात. म्हणूनच कष्ट करा. शिक्षण आणि शहाणपणाचे समतोल राखलेले आयुष्य नक्कीच आपली वाट पाहत बसलेला असेल.