मोठी बातमी! राज्यातील इयत्ता १२ वीची परीक्षा अखेर रद्द, ठाकरे सरकारचा निर्णय
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याआधी राज्य सरकारने 10 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता 12 वीची परीक्षा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अखेर राज्य सरकारने 12 वीची परीक्षा रद्द केली आहे.
राज्याच्या मंंत्रिमंडळाने बारावीची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची माहिती मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत 12 ची परीक्षा रद्द करण्यासंदर्भात आपत्ती व व्यवस्थापन विभागाकडे शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव पाठवला जाईल. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं.
या प्रस्तावाला आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. परीक्षा रद्द करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच होती असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हणाले.
दरम्यान, परीक्षा न घेता बारावी परीक्षेचा निकाल कसा लावायचा याचा फॉर्म्युला शिक्षण विभाग निश्चित करेल. इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या गुणांची सरासरी काढून निकाल देणं, हा एक पर्याय असला तरी गेल्यावर्षी अकरावीची परीक्षा झालेली नव्हती, ही अडचण आहे. तसेच पदवी प्रवेशासाठी सीईटीच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो.