“भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय”

मुंबई : राज्यात मराठा आंदोलनाचा विषय पेटलेला असताना ओबीसी आरक्षणावरूनही राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी ठाकरे सरकारवर विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेेंनी भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. राज्यात 2017 पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटं बोलण्याचं काम करतंय. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नसल्याचं पटोले म्हणाले.भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणलं, असंही पटोले म्हणाले. याआधीही ओबीसी आंदोलनावरून पटोलेंनी भाजपवर निशाणा साधला होता.

दरम्यान, भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये.भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी, असं नान पटोले यांनी म्हटलं होतं.

Share